तांदळाचा काळाबाजार : प्रशासन लक्ष देणार काय
पांढरकवडा : कोरोनाकाळात हाताला काम नसल्याने पोटाची आबाळ होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून काही घटकांना मोफत तर काही घटकांना अल्पदरात धान्य उपलब्ध करून दिले. मात्र, काही व्यापारी सर्वसामान्य व गरिबांकडून या शासकीय तांदळाची खरेदी करून मोठ्या वाहनांमध्ये पोते भरून तो तांदूळ गोंदिया, भंडारा जिल्ह्यात नेऊन विक्री सुरू असल्याची माहिती आहे. काही मंडळी काळाबाजार करीत असल्याचे समोर आल्याने शासनाच्या उदात्त हेतूला धक्का पोहोचतो आहे. त्यामुळे शासकीय धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पांढरकवडा तालुक्यात १३२ स्वस्त धान्य दुकानामार्फत ३४ हजार लाभार्थी कुटुंबाना मोफत साडे तीन हजार क्विंटल व नियमित साडेसात हजार क्विंटल धान्य दरमहा उपलब्ध होते. शेतकरी कुटुंबाना गहू २ रुपये किलो, तर तांदूळ तीन रुपये किलो दराने दिला जातो. अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना हे धान्य मोफत वितरित केले जाते. मात्र, नागरिक ते धान्य स्वतःच्या उपयोगात आणत नसून सर्रासपणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. यात तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. तसेच तालुक्यातील काही भागात १ किलो साखरेच्या बदल्यात ३ किलो तांदूळ देत असल्याची माहिती आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही जण किराणा व्यावसायिकांना तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना धान्य विक्री करीत असून संबंधित व्यावसायिक हे फरान, बैलीम यांच्या कडे विक्री करून फरान, बैलीम हे गोंडवाकडी येथील गोडाऊन मध्ये धान्य जमा करून गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मोठ्या व्यापाऱ्यांना विकत आहे. ग्रामीण भागात गहू व तांदूळ रोजच्या जेवणातील घटक नाहीत.
ज्वारीची भाकरी हा आहाराचा भाग आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारा प्रती माणसी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ हा काही कुटुंबात अतिरिक्त ठरतो आहे. बाजारात किमान अनुक्रमे २० रुपये व ४० रुपये दर असलेला गहू व तांदूळ त्यामुळेच आता काळ्या बाजारात मोस्ट वॉन्टेड ठरतो आहे. हा गहू -तांदूळ खरेदी करणाऱ्या टोळ्या आता गावोगावी जाऊन गहू ८ ते १०, तर तांदूळ १५ ते २० रुपये प्रतिकिलोने खरेदी करत आहेत.यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात अद्याप कुठल्याही व्यापाऱ्यांवर व दुकानदारावर कारवाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील काही गावांतील लोकांकडे याबाबत चौकशी केली असता अशी वाहने महिन्यातून एकदा धान्य खरेदीसाठी येतात, अशी माहिती त्यांनी दिली. ज्यांच्या रेशनकार्डवर माणसे जास्त आहेत, पण ते रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, अशांना मिळणारे गहू-तांदूळ अतिरिक्त होतात. काहींच्या घरात एक कट्टा म्हणजे ५० किलो गहू-तांदूळ दोन महिन्यांला जमा होतात. त्याचे सरासरी हजार रुपये विनासायास मिळतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
योगेश पडोळे
प्रतिनिधि पांढरकवडा