मुंबई: भाजप सरकारने बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इकडे महाराष्ट्रात इंदूमिलच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन केले होते. त्यावेळी लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते. परंतु दोन वर्षे उलटून गेली तरी अद्याप स्मारकाचे बांधकाम सुरु झालेले नाही. समाजाच्या प्रतिकांचे अशा पध्दतीने मतांसाठी राजकारण करुन सरकारने तमाम आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करु नये असे मत काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले स्मारकासाठी अद्याप जमिनीच्या हस्तातंराची, टेंडरिंगची कोणतीही प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. अशी परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र पुढील महिन्यात स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल असे सांगत आहे. परंतु मुख्यमंत्री गुजरात निवडणुकीच्या तोडांवर मतांसाठी पुन्हा आंबेडकरी जनतेच्या भावनाशी खेळत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.
उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी रद्द केल्याच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. राजू वाघमारे म्हणाले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी रद्द करुन भाजप सरकारने तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान केला आहे. भाजपा सरकारच्या मनात बाबासाहेबांबद्दल किती बेगडी प्रेम व खोटी आस्था आहे, हे या घटनेवरुन दिसून येते. याचा आम्ही निषेध करतो.
गुजरात मध्ये दलित नेता जिग्नेश मेवाणीवर झालेल्या हल्ल्याबाबत वाघमारे म्हणाले जिग्नेश मेवाणी या युवकाने गुजरात निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला तगडे आव्हान दिले आहे. या आव्हानामुळे भाजप सरकारच्या पायाखालची वाळू घसरली असून पराभवाच्या भितीपोटीच भाजपा कार्यकर्त्यांकडून जिग्नेश मेवाणीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे निषेध करतो.
देशात सुरु असलेल्या या सर्व प्रकारांकडे बघता असे लक्षात येते भाजपा सरकारला दलित आणि मागासवर्गीय समाज विरोधी असून त्यांचे या भाजपा सरकारचा धर्मांध व जातीयवादी चेहरा समोर आल्याची टीका राजू वाघमारे यांनी केली आहे.