परभणीसह बीड प्रकरणात सरकारची भूमिका आरोपींना पाठीशी घालण्याची असल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सरकारला घेरले.
महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधकांनी निषेध मोर्चा काढला. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर हल्लाबोल केला.
परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशी च्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यू झाला. तर बीड मधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी आणि त्यांचे जवळचे सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार असल्याचेही विरोधक म्हणाले आहेत.
विरोधकांनी यावेळी फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी देत विधानभवन परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात भाई जगताप सचिन अहिर नाना पटोले विकास ठाकरे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर राहुल पाटील सचिन भोईर आदींचा समावेश होता.