नागपूर: सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांर्तगत मध्य नागपुरातील विणकर कॉलोनी मैदान, तांडापेठ येथे बुधवारी (ता२३) विशेष शिबिराचे उदघाटन करण्यात आले.नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घ्यावा तसेच शिबिराला मोठ्या संख्येत भेट द्यावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात मध्य नागपूरचे आमदार श्री. विकास कुंभारे, आमदार श्री. प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, श्रीमती अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक सर्वश्री. जितेंद्र(बंटी) कुकडे, सुधीर(बंडू) राऊत, महेश(संजय) महाजन, मनपाचे सहायक आयुक्त घनशाम पंधरे यांच्यासह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी” अंतर्गत मध्य नागपुरातील विणकर कॉलोनी मैदान, तांडापेठ बुधवार २३ ऑगस्ट ते शुक्रवार २५ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली मिळत आहे. शासनाच्या विविध विभागाच्या सोयीसुविधा देखील एकाच ठिकाणी प्राप्त होत असल्याने अधिकाधिक संख्येत नागरिकांनी या शिबिराला भेट देत लाभ घ्यावा असे आवाहनही मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात केले.
नागरिकांना शिबिरात नगर भूमापन सिटीसर्व्हे, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय सेतू केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभाग, नागपूर महानगरपालिका, अन्न व नागरी पुरवठा विभाग, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय आदी विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.