नागपूर : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नाही,असे आश्वासन दिले. यावर समाजाची दिशाभूल न करता त्यावर सरकारने ठाम राहावे. अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
नागपुरात रविभवन येथे आरक्षणाच्या विषयावर मंथन करण्यासाठी विदर्भातील ओबीसी संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.ओबीसींच्या हक्कासाठी ‘करेंगे या मरेंगे ’अशी भूमिका ठेवून लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या जरांगे यांच्या भूमिकेला विरोध असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, आ.अभिजीत वंजारी आदी उपस्थित होते.
दरम्यान येत्या २६ नोव्हेंबरला नागपुरात भव्य सभा ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करण्यासाठी विविध संघटना व घटकांची सर्वसमावेशक कृती समिती गठित केली जाणार आहे. दोन-चार दिवसांत समितीची घोषणा केली जाईल. संविधान दिनी २६ नोव्हेंबरला नागपुरात भव्य सभा आयोजित करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.