नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार अनिल सोले की महापौर संदीप जोशी यावर खल सुरू होता. अखेर आज संदीप जोशी यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात आता जोशी विरुद्ध वंजारी असा थेट सामना होणार आहे. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार, असं दिसतंय.
गेल्या अनेक वर्षांपासून नितीन गडकरी या मतदारसंघातून निवडून येत होते. त्यानंतर आता गडकरींचा वारसदार कोण? असा प्रश्न पडला होता. त्यासाठी अनिल सोले आणि महापौर संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा होती. आता जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूरच्या पदवधीर मतदारसंघात आजवर भाजपचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार येथून निवडून आलेला नाही. गडकरी यांची राजकीय कारर्कीदच या निवडणुकीने घडविली. त्यांचे वारसदार म्हणून अनिल सोले यांनी हा मतदारसंघ भाजपकडे शाबूत ठेवला. मात्र, संदीप जोशी यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते.
पक्षाने उमेदवारी दिली तर लढण्यास तयार आहे, असे सांगून जोशी यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यामान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा कौल यंदा मिळेल, असा विश्वासही त्यांना होता. अखेर तो खरा ठरला आहे. आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर त्यांचे महापौरपद दयाशंकर तिवारी यांना देण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी भाजपला दोनवेळा येथून जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. आता नव्या दमाचे तरूण अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक संघटना आणि आघाड्यांचेही उमेदवार इच्छुक असल्याने यंदा ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
अशी होईल निवडणूक –
उमेदवारी अर्ज दाखल – ५ ते १२ नोव्हेंबर
छाननी – १३ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत – १७ नोव्हेंबर
मतदान – १ डिसेंबर
मतमोजणी – ३ डिसेंबर