नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरिता पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे गुरुवारी (ता.27) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त श्रीमती डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकर, जिल्हापरिषदेचे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, समग्र शिक्षण विभगाचे जिल्हा समन्वयक अभिजित राऊत, क्रीडा तज्ज्ञ श्री. उमेश वाझुरकर, अर्जून व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री विजय मुनिश्वर, श्री संजय लुंगे, श्री चंद्रशेखर पाचोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण झाले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पथसंचलन व सलामी देण्यात आली. यावेळी मातृसेवा संघाच्या स्नेहांगण शाळातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले.
आमदार श्री मोहन मते यांनी मनपातर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले की, मनपातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. परंतु मनपातर्फे पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने दिव्यांगाकरिता क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मनपाने पुढे मतीमंद मुलांकरिताही अशा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करावे, यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अशा स्पर्धांकरीता आमदार निधी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अनेक दिव्यांगांनी पॅरालिम्पिक मध्ये पदक जिंकले आहेत. दिव्यांग क्रीडा स्पर्धेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळेल असेही आमदार श्री. मते म्हणाले
याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात. महानगरपालिकातर्फे खेळाडूंसाठी दरवर्षी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींकरीता स्पर्धा आयोजित करण्याचे मनपाने ठरविले. ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये टॅलेन्ट आणि स्पार्क आहे, त्यांना समोर जाण्याकरिता अशा क्रीडा स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहेत. नागपूर शहरातील 1210 शाळांमधील 22 क्रीडा प्रकारात 610 दिव्यांग खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत सहभाग नोंदविणे ही कोणतीही स्पर्धा जिंकण्या इतकेच महत्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी असणारे सर्वच विजेते आहात. जिंकण्याबरोबर खेळाडू वृत्तीने या स्पर्धेत भाग घेण्यात यावे असेही ते म्हणाले. शिक्षक आणि पालकांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचे अभिनंदनही आयुक्त यांनी केले.
अशाप्रकारच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील स्पार्क आणि टॅलेन्ट बाहेर येऊ शकते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल असेही ते म्हणाले. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे अभिप्राय सुद्धा पालकांनी नोंदवावे असे आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले. दरवर्षी अशा दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केले जातील असेही त्यांनी सांगितले
पॅरालिम्पिक मध्ये भारताचा चढता आलेख आहे. ज्या खेळाडूंमध्ये चमक (स्पार्क) आणि प्रतिभा आहे. ज्यांना वेगवेगळ्या खेळामध्ये पुढे जायचे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे आहे, त्यांच्याकरीता अशा क्रीडा स्पर्धामुळे व्यासपीठ मिळेल. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये असलेले चमक(स्पार्क) आणि प्रतिभेला मदत करावे असेही ते म्हणाले. दिव्यांग खेळाडूकरीता शिष्यवृत्ती योजना सुद्धा सुरु आहे. इतर योजना सुद्धा सुरु आहेत अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात दोन दिवसीय ‘दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी क्रीडा ज्योत प्रज्वल्लाने स्पर्धेची सुरुवात झाली. यानंतर खेळाडूंना शपथ श्री. संजय लुंगे यांनी दिली. यावेळी तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी श्री पियुष आंबुलकर यांनी मानले.
610 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात शहरी भागातील सर्वसामान्य शाळांमधील तसेच विशेष शाळेतील अशा एकूण 1210 शाळांमधील 610 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रथमत: प्रकारच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे.
गुरुवारी बौद्धिक दिव्यांग, कर्णबधिर दिव्यांग अस्थिव्यंग दिव्यांग अंध व अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तीच्या विविध क्रीडा स्पर्धेत अॅथलेटीक्स , दौड (रनिंग), शॉर्ट जम्प, लाँग जम्प , सॉफ्टबॉल थ्रो, लांब उडी, जलतरण, सायकलिंग, रस्सीखेच, क्रिकेट, गोळाफेक, कॅरम, फ्री स्टाईल, सिटींग व्हॉलीबॉल, व्हिल चेअर रनिंग, बुद्धीबळ, पासिंग द बॉल, स्पॉट जम्प यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवारी विविध दिव्यांग क्रीडा स्पर्धांसह स्पर्धेचा समारोप होणार आहे.