नागपूर – नागपूर शहरात आरोग्याच्या उत्तम सुविधा असाव्यात, गरिबांना सर्व प्रकारचे उपचार मिळावे यासाठी सर्वांनीच सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मेडिकलच्या जागाही वाढल्या आहेत. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा नागपुरात उपलब्ध आहेत. शिवाय अनेक मोठे हॉस्पिटल्स झाल्यामुळे बाहेरच्या राज्यांमधील रुग्णही इथे उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. नागपूर शहराच्या विकासात येथील डॉक्टरांचेही मोठे योगदान राहिलेले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) येथे केले.
भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, प्रसिद्ध अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी, भाजप नेते श्री. संजय भेंडे, डॉ. उपेंद्र कोठेकर, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागपूर शहरातील डॉक्टर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपली साथ मिळाली, मी खासदार झालो आणि मंत्रीही झालो. त्यामुळे नागपूरसह देशभरात अनेक चांगली कामे करता आली. पण तुम्ही निवडून दिले नसते तर ही कामे करता आली नसती. माझ्या कामामध्ये तुमचाही सिंहाचा वाटा आहे.’ सूत्रसंचालन अभिजित मुळे यांनी केले.