५ दिवसात २३००० लोकांनी दिली भेट
नागपूर: नागपूरकरांची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आणि नागपुरात माझी मेट्रो धावू लागली. नागपुरात होत असलेला हा विकास नागपूरकरांनी डोळ्याने पाहिला असला तरीही यातले बारकावे, बांधकामाची विशेषता, प्रकल्पाचे महत्व, वैशिष्ट्ये जाणून घ्यायला प्रत्येकजणच उत्सुक होता. त्यांच्या या उत्सुकतेचे शमन करण्यासाठी महा मेट्रो नागपूरतर्फे प्रकल्प उदघाटनाच्या दिवसापासूनच प्रकल्पाचे सर्व वैशिष्ट्ये नागरिकांपर्यंत पोचवण्याचा उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ५ दिवस सुरु असलेल्या या प्रदर्शनाला एकूण २३००० लोकांनी भेट दिली. दिनांक ११ मार्च सोमवार रोजी प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय विभाग, सामाजिक संघटना आणि संस्थेनी भेट दिली.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक दृष्टीने प्रदर्शनीचे अवलोकन केले आधुनिक बांधकाम, डिजाईन, अंतरसज्जा ह्या केवळ देखाव्यासाठी नसून भविष्यातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून अभ्यासात्मक दृष्टीने फायद्याचे ठरत असल्याचे मत यावेळी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. दत्त मेघे एमबीए कॉलेज, रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, आय.टी.आय. महाविद्यालय, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सेंट व्हिन्सेंट पलोटी यासारख्या अनेक महाविद्यालयांनी शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनीत लावलेल्या माहितीच्या नोंदी घेतल्या. संपूर्ण शहरातून आपल्या पाल्यांना प्रदर्शन दाखवण्यासाठी पालकांची गर्दी येत राहिली. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाइक तसेच सायकल चालवून लोकांनी आनंद व्यक्त केला. दिल्ली बंगलोर येथून आलेल्या काही व्यवसायिक प्रतिनिधींनी प्रदर्शनाला विशेष भेट दिली आणि प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊन प्रकल्पाच्या कार्याबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केली.
महामेट्रो नागपूर प्रकल्पात आतापर्यंत झालेल्या कार्याचा सविस्तर तपशील मॉडेल स्वरूपात प्रदर्शनीत सादर करण्यात आला होता. प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांना प्रकल्पात झालेल्या आणि निर्माणाधीन कार्याची मौखिक आणि व्हिडिओद्वारा माहिती देण्यात येत होती. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांना विशिष्ट डिपार्टमेंटच्या अधिकार्यांद्वारा देण्यात येत होती. यावर शहरात होत असलेले आंतराष्ट्रीय स्तरीय स्थापत्य, आधुनिक बांधकाम, पर्यावरण संवर्धनासाठी होणारे सर्वस्तरीय प्रयत्न, सौर ऊर्जा संकल्पना, प्रॉपर्टी डेव्हलोपमेंटचे विविध मॉडेल, चारस्तरीय वाहतूक योजना अश्या विविध कार्यप्रयोजनाची माहिती मिळण्यासाठी नेहमीच अश्या प्रदर्शनीचे आयोजन शहरात वेळोवेळी होत राहावे अशी इच्छा प्रदर्शनाच्या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केली.नागरिकांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या कलाकृतीसह सेल्फी काढून सोशल मीडियावर जिकडे तिकडे प्रदर्शित केले.