नागपूर : जनसंघाचे संस्थापक सदस्य, एकात्म मानववाद व अंत्योदयाचे प्रणेते पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज शुक्रवारी (ता.११) भारतीय जनता पार्टीतर्फे विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. भाजपा प्रदेश सचिव तथा नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, दुर्बल घटक समितीच्या सभापती कांता रारोकर, शहर उपाध्यक्ष महेंद्र राऊत, ओबीसी आघाडीचे महामंत्री मनोहर चिकटे, बेटी बचाओ बेटी पढाओच्या विदर्भ संयोजिका संतोष लढ्ढा, मंडळ महामंत्री राजेश गोतमारे, जे.पी. शर्मा, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, अशोक देशमुख, राजूभाऊ दिवटे, अभय मोदी, आशीष मर्जीवे, महिला अध्यक्ष ज्योती वाघमारे, सिंधुताई पराते, ललिता वैष्णव, खुशाल वेळेकर, गीता वैष्णव, महेंद्र कटारिया, सचिन भगत, भुपेश अंधारे, बलराम निषाद, प्रदीप गोसावी, सुधीर दूबे, नारायणसिंह गौर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम म्हणाले, पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी नेहमी राष्ट्राच्या तुलनेत समाजाला महत्व दिले. जगातील अनेक बलवान राष्ट्र नष्ट झालेत मात्र काही राष्ट्रविहीनांनी सामाजिक ताकदीने आपले राष्ट्र उभे केल्याचे ते नेहमी उदाहरण द्यायचे. राज्य, राष्ट्र ही मोठी ताकद असली तरी सर्वोच्च नाही, सर्वोच्च फक्त समाजच आहे. ही समाजाप्रति सर्वोच्च भावना पंडीत दीनदयाल उपाध्याय यांची होती.
लोकांच्या जीवनाचे समान ध्येय, आदर्श, विचार आणि मिशन हे कुठल्याही राष्ट्राचा आत्मा असतो. याचे आपल्या जीवनात अंगीकार असल्यास राष्ट्र सशक्त होउ शकते, हे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात. पं.दीनदयाल उपाध्याय यांचे विचार, त्यांच्या आचरणाला मार्गदर्शक मानून आज भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.