नागपूर:सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांचे जागेवरच निरसन करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना 27 एप्रिलला सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता जनतेच्या तक्रारारी सोडवण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
नागपूर शहरातील पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात कंबर कसली आहे. या अनुषंगाने नागरिकांच्या प्रलंबित अथवा कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशमध्ये 27 एप्रिलला पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी हे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान प्रत्यक्षात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडविणार आहेत. यासाठी सिंगल यांनी नागपूरकरांना आवाहन करत कोणाच्या तक्रारी किंवा कोणतीही प्रकरणे प्रलंबीत असतील तर थेट वरिष्ठ पोलिसांकडे त्यांनी आपल्या समस्या आणि भावना व्यक्त कराव्यात. तसेच 27 एप्रिलला संबधित नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात आणून त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजार राहावे. दरम्यान त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी संबधित नागरिकांशी प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतली. तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करतील, असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल म्हणाले.