नागपूर: केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व जहाज वाहतूक मंत्री तसेच भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या उद्या दिनांक 27 मे रोजी साजर्या होणार्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या जिल्हा आणि शहरातील कार्यकर्त्यांनी गडकरींचे अभीष्टचिंतन करण्यासाठी मोठ्या संख्येत कस्तुरचंद पार्क येथील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शहर व जिल्ह्यातील सर्व आमदार व राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीचा सोहोळा कस्तुरचंद पार्क येथे सायं. 6 वाजता विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या दिनांक 27 रोजी संपन्न होत आहे. या सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या साक्षीने गडकरी उद्या 61 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या संधीचा लाभ घेत भाजपाच्या जिल्हा व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांचे अभीष्टचिंतन करून त्यांना दीर्घायुरारोग्य लाभेल अशा शुभेच्छा द्याव्यात, अशी विनंती सर्व आमदार आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केली आहे.
या षष्ट्यब्दीपूर्तीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, चाहते, मित्र, नागरिक उपस्थित राहावे म्हणून पालकमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैठकी घेतल्या. आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना आणि उपस्थितांना या कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण दिले व आवाहनही केले. याशिवाय आपल्या स्वत:च्या मतदारसंघात 27 ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकी आयोजित करून या कार्यक्रमाचा लाभ अधिक लोकांना मिळावा यासाठी संपर्क केला.
कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी येताना सोबत हार, फुले, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ आणू नये. केवळ गडकरींना मनापासून शब्दाने शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन करावे, असेही आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधीर पारवे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. ना. गो. गाणार आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे.