मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राज्य रस्ते जिल्हा मार्ग व इतर मार्गाबाबत सद्यस्थितीत सुरू असलेल्या योजनानिहाय कामकाजाचा पदुम राज्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज आढावा घेतला.
याबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे, कार्यकारी अभियंता श्री. कुलकर्णी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गायकवाड, भूसंपादन अधिकारी श्रीमती करमरकर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. खोतकर म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यातील संबंधित कामे धीम्या गतीने सुरू असल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करावी. जी कामे पूर्ण झाली आहेत त्या भागात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोकजागृती आणि प्रबोधन करण्यात यावे. तसेच अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी, असे श्री. खोतकर यांनी यावेळी सांगितले.