नागपूर. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाई तसेच पूर परिस्थितीबाबत आढावा व उपाययोजने बद्दल शनिवारी (ता. 22) रोजी नागपूर महानगरपालिका आयुक्त सभाकक्षात बैठक घेतली. त्यांनी या पावसाळ्यात नागरिकांना पुराचा कोणत्याही प्रकारच्या त्रास होणार नाही तसेच पाण्याची गळती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांनी यावर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी सुद्धा वाढविण्याकरिता प्रयत्न करण्याचे सूचित केले.
बैठकीत पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार आणि डॉ. श्वेता बॅनर्जी उपस्थित होत्या. सर्वप्रथम डॉ अभिजीत चौधरी यांनी माननीय पालकमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री बावनकुळे यांनी सांगितले की, सिमेंट रस्त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात काही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. झोन स्तरावर यासाठी सखल भागाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी याकडे आतापासून लक्ष दिले पाहिजे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याचा दृष्टीने सुद्धा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. खासगी आणि सार्वजनिक विहिरीला स्वच्छ करून त्याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा. पावसाळी नाल्याची स्वच्छता करणे आणि त्यामधून पाणी वाहून न जाता जमिनीत मुरले पाहिजे यासाठी सुद्धा उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचविले. नागपूर शहरात पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याची गळती कमी होण्यासाठी कामे करा. पाणी टंचाईबद्दल उपाययोजना करण्यासाठी आमदार, माजी नगरसेवक आणि जनप्रतिनिधी सोबत चर्चा करण्याचे निर्देश दिले. नाग नदी, पोहरा नदी आणि पिवळी नदी ची सखोल स्वच्छता करणे आणि जिल्ह्याच्या सीमे पर्यंत खोलीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ही सूचित केले. पालकमंत्री यांनी आश्वासन दिले की आवश्यकता असल्यास महाराष्ट्र शासन कडून मदत केली जाईल.
प्रारंभी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहरातील पाणी टंचाई व तसेच पूर परिस्थितीबद्दल करावयाच्या उपाययोजनासाठी पॉवर पॉईंट प्रेझेनटेशन केले. यावेळी त्यांनी शहर टँकरमुक्तीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. शहरात सध्या ५४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून गेल्यावर्षी याचवेळी १३७ टँकरची सेवा घेतली जात होती. धरमपेठ, नेहरूनगर व मंगळवारी झोन टँकरमुक्त झाले आहेत. शहरात ८६० सार्वजनिक विहीरी असून त्यापैकी ८९५ विहिरींची साफसफाई करण्यात आली आहे. शहरात ५०८० विंधन विहीरी असून या विहिरींची देखभाल करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, विंधन विहिरीची दुरुस्ती, अमृत एक आणि दोन मधून केल्या दिलेल्या कामाची माहिती दिली. शहरातील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत क्षतिग्रस्त नाल्याचे व संरक्षण भिंतीच्या मजबुतीकरणाच्या कामे सुरू आहे. यात ५६ क्षतिग्रस्त नदी व नाल्याच्या भिंतीचे बांधकाम तसेच ४१ क्षतिग्रस्त रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच नागपुरात वाहणारे नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू असून येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील वाया जाणारे पाणी वाचविण्यावर भर दिला.
यावर नियंत्रण आणल्यास उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्याचप्रमाणे खासगी विहिरी व सार्वजनिक विहिरीचे पुनर्भरणावर भर देण्यात यावा. सार्वजनिक विहिरींवर लघु नळयोजना सौर उर्जेच्या सहाय्याने सुरू करता येईल, याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. शहरातील भूजलपातळीवर वाढविण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचा पूर्ण वापर करावा. शहरात पडणाऱ्या अधिकाधिक पाण्याचे पुनर्भरण करण्यावर भर देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
पावसाळ्यात पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करून संकट येणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी ढिगारे साचलेले असतात त्यामुळे पाण्याचा भराव निर्माण होतो. याची पाहणी ड्रोनद्वारे करण्यात यावी. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्या सर्व झोनमध्ये ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना आतापासून केल्यास संकटाचा सामना करावा लागणार नाही.
यावेळी पूर्व नागपूरचे आमदार श्री.कृष्णा खोपडे यांनी आपल्या मतदार संघातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
या बैठकीला उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अशोक गराटे, प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. रंजना लाडे, गणेश राठोड, अग्निश्मन प्रमुख बी.पी. चंदनखेडे यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.