मौदा:- सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात व त्या मार्गी लागाव्यात यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच त्यांनी आज मौदा तालुक्यातील नागरिकांशी थेट संवाद साधला.
निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक अशा सर्व घटकातील नागरिकांनी या जनसंवादाला उपस्थित राहून आपल्या मागण्या प्रत्यक्ष मांडल्या. नवीन रस्ते, नोकऱ्या, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने दिली. या सर्व निवेदनांचा स्वीकार करीत त्या मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. आरोग्याशी संबंधित अनेक अर्जांना तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह तालुक्यातील विविध भागातून आलेले नागरिक यावेळी उपस्थित होते.
कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना अभिवादन
मौदा येथील कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मदिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगार सुनील वानखेडे व संगीता मानवटकर, बाल चित्रकार आचल श्रीराम कटरे यांना सन्मानित केले. कर्मवीर दादासाहेबांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. त्यांचे कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे व भविष्यातही देत राहील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.