पुणे: माणिकचंद ब्रँडचे (गुटखा) संस्थापक, ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकशेठ धारीवाल यांचे आज प्रदीर्घ आजाराने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
धारीवाल यांना गालाच्या लाळग्रंथींचा कर्करोग झाला होता. रसिकशेठ धारीवाल यांना न्यूमोनिया झाल्यामुळे ४ सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अशात त्यांना संसर्ग होऊन त्यांच्या शरीरातील अवयव निकामी झाले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
शिरुरमधील एक बडे प्रस्त म्हणून धारीवाल यांची ओळख होती. सुरुवातीला तंबाखूचे व्यापारी आणि पुढे गुटखा उद्योजक म्हणून ते प्रसिद्ध झाले. त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या उद्यमशीलतेचा ठसा उमटवला होता.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. दाऊद टोळीच्या पाकिस्तानातील कराची येथे गुटखा प्लांट उभारण्याच्या कामात धारीवाल यांनी दाऊदला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र कोर्टाने त्यांची जामीनावर सुटका केली होती.
धारीवाल यांनी १९८० आणि १९८५ अशी दोन वेळा शिरुर विधानसभेची निवडणूक लढवली होती. शिरुर शहरावर त्यांचे वर्चस्व होते. विशेष म्हणजे शिरुरचे ते तब्बल २१ वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांनी अनेक संस्था, व्यक्तींना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या. जैन समाजातील अनेक संघटनांना तर त्यांनी सढळ हस्ते मदत केली. शिरुरमध्ये त्यांनी हॉस्पिटलही उभारले होते. राज्यातील अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.