नागपूर: शहरात गुटखा-तंबाखूची तस्करी सर्रास सुरु आहे. वाडी पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत ५५ लाखांचा गुटखा जप्त केला.
माहितीनुसार, उत्तरप्रदेशातून नागपुरातील तंबाखू व्यापाऱ्यांनी तब्बल ५५ लाखांचा गुटखा तस्करी करून आणला होता. यासंदर्भात वाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या तस्करीला राजकीय पाठबळ असल्याने वाडी पोलीस दबावात असल्याचे बोलले जात आहे.
उत्तरप्रदेशातून ५५ लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा घेऊन ट्रक शनिवारी सायंकाळी वडधामना हद्दीत पोहोचताच वाडीचे सहायक निरीक्षक राहुल सावंत यांनी छापा घालून ट्रक ताब्यात घेतला. मात्र, गुन्हा दाखल होण्यास तब्बल दोन दिवसांचा कालावधी लागल्याने पोलिसांना संशय आला. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. तर हर्षल आणि विजय यांच्यासह अन्य तस्करांचा पोलीस शोध घेत आहेत.