नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आबा बागुल यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सुरु होती.पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात आबा बागुल यांनी काँग्रेस भवनात आंदोलनही केल्याची माहिती आहे.
आज नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची आबा बागुल यांनी भेट घेतल्याने ते भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. बागुल यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.