वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आष्टी, कारंजा, सेलू, आर्वी या भागात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आष्टी तालुक्यात तळेगाव, भारासवाडा परिसरात गारांसह वादळी पावसाने चांगले झोडपून काढले. अचानक आलेल्या या वादळामुळे रस्त्यावर झाडे कोसळली असून काही घरांचेही नुकसान झाले आहे.
मान्सून उंबरठ्यावर असतांना वादळी पावसाचा तडाखा जिल्ह्यात नुकसान करणारा ठरला आहे. सायंकाळी चारच्या सुमारास सुरु झालेल्या वादळी पावसाने आष्टी तालुक्यातील रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. गिरड, समुद्रपूर भागात विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा ही खंडित झाला आहे. रसुलाबाद येथे शेतातील कुक्कुटपालनाचे शेड पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अल्लीपूर नजीकच्या पवनी येथे गोविंद इंगोले या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज पडून दोन बैल जागीच ठार झाले.