बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातीलपूर्णा नदीकाठच्या काही गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळतीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तीन दिवसातच अचानक टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गुरुवारच्या प्राप्त अहवालानुसार, अकरा गावात १०० हून अधिक टक्कल बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.प्रथम डोक्याला खाज सुटून त्या पाठोपाठ केस गळती होऊन टक्कल पडण्याच्या या आकस्मिक उद्भवलेल्या समस्येने शेगांव तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील रहिवाश्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. टक्कल बाधितांच्या त्वचेचे व केसांचे नमुने बायोप्सी टेस्ट साठी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त होण्याची अद्याप प्रतिक्षा आहे. केसांची गळती झालेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात केस गळती होण्याचा प्रकार प्रथमताच समोर आल्याने वैद्यकीय तज्ञही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या केस गळती प्रकाराचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.
‘या’ गावांमध्ये आढळले सर्वाधिक बाधित –
८ जानेवारी रोजी बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छींद्रखेड, हिंगणा, घुई या सातू गावांत एकूण ६४ बाधित आढळले तर ९ जानेवारी रोजी भोनगाव, तरोडा कसबा, पहुरजिरा, माटरगाव, निंबी या पाँच गावातील ३६३ बाधितांची भर पडून हा आकडा आता १०० पर्यंत पोहोचला आहे. पाणी तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार, या गावांतील बोअरवेलच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण ५४ टक्के आढळून आले आहे. सामान्यतः हे प्रमाण १० टक्के असायला हवे. क्षारांचे प्रमाण २१०० आढळले आहे, सामान्यत हे प्रमाण ११० असायला हवे. नायट्रेट व क्षारांचे अत्याधिक प्रमाणामुळे संबंधित गावातील पाणी वापरण्यास आरोग्याचे दृष्टीने घातक आहे.
आर्सेनिक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल एक आठवड्यात प्राप्त होईल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली.
दूषित पाण्यामुळे होतेय केसगळती आजार –
दुषित पाणी हे एक कारण समोर आले असले तरी उच्चस्तरीय प्रयोगशाळेतील अहवालानंतरच केस गळतीच्या समस्येचे शास्त्रीय कारण व निदान समोर येऊ शकेल. त्यानुसारच उपचार करता येऊन समस्येवर नियंत्रण मिळवता येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीते यांनी सांगितले.