नागपूर : हलबांचा कोष्टी हा व्यवसाय असल्याचा शासकीय अध्यादेश काढून नोकरीत आरक्षण देण्यात आले नाही तर हलबा समाज भाजपाला मतदान करणार नाही, असा कडक इशारा राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने भाजपाला देण्यात आला आहे. राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या समाजरत्न रा.बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची आज सांगता झाली. यावेळी यासंदर्भातील ठराव पास करून हा इशारा देण्यात आला.
हलबांच्या पूर्वजांच्या कोष्टी हा व्यवसाय असल्याचे भाजपाने निवडणुकीपूर्वी मान्य केले होते. राज्यात सत्तेत आल्यानंतर तसा अध्यादेश काढू आणि समाजाला न्याय देऊ, असे आश्वासन भाजपाने दिले होते, पंरतु चार वर्षांपासून सत्तेत असतांनाही आतापर्यंत अध्यादेश काढण्यात आला नाही. महाराष्ट्राच्या जाती कायद्याची अंमलबजावणी संविधान विरोधी आहे. त्यामुळेच अन्याय, अत्याचारात वाढ झाली आहे, असा दावा करून जाती कायद्याची यावेळी होळी करण्यात आली.
तसेच आरक्षण विरोधी भाजपाने हलबांचा विश्वासघात केला आहे. येत्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने हलबांचा कोष्टी व्यवसाय असल्याचा अध्यादेश निर्गमित न केल्यास येत्या निवडणुकीत हलबा समाज भाजपला मतदान करणार नाही. असा निर्णय घेण्यात आला. हलबा समाजाच्या या आंदोलनात महिलांचा सहभागी अधिक होता. त्यांनी भाजपाविरोधी घोषणा देत महाराष्ट्र जाती कायद्याच्या प्रति जाळल्या. अॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.