नवी दिल्ली:लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या अपयशाला समोर जावे लागले.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्य अधिकृत एक्स अकउंटवर माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक जारी केले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो.
याचबरोबर काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे मानले जातात.२०१४ ते २०१९ या कालावधीत बुलढाना विधानसभा मतदारसंघाचे सदस्य होते. त्यांनी बुलढाना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर गेल्या काही काळात त्यांनी पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम केले आहे.