नागपूर: ‘मी एक वृक्ष लावीन व ते जगवीन’, अशी वृक्ष संवर्धनाची शपथ महापौर नंदा जिचकार यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्य़ात आलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाअंतर्गत खामलामधील शास्त्री ले-आऊटमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, झोनल अधिकारी महेश बोकारे उपस्थित होते. किमान एकच वृक्ष लावा पण ते कायम जगवा, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. झाडांचे संवर्धन करणे ही काळाजी गरज असून त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असेही त्या यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला विशाल कावरे, श्रीमती श्रीरसागर, सुफले, खटी, संदीप कुळकर्णी, अनिरूद्ध कडुस्कर, ताराचंद मून, डोंगरे आदी उपस्थित होते.
दीक्षाभूमी परिसरात वृक्षारोपण
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत दीक्षाभूमी परिसरात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, विभागीय आरोग्य निरीक्षक प्रकाश वाकलकर, सुनिती देव, अर्चना देशपांडे आदी उपस्थित होते.
महापौरांनी केले ‘डस्ट बीन’चे वाटप
नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ओला, सुका कचरा वर्गीकरण मोहिमेअंतर्गत प्रभागातील नागरिकांना हिरवा व निळा कचऱ्याचे डबे घरी जाऊऩ भेट दिले. ओला व सुका कचरा निर्मितीस्थळापासून विलग करा, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.