नागपुर: नागपूरातील मिहान परिसरात बोईंग व एअर इंडीयाचा एम.आर.ओ. प्रकल्प , रिलायन्स-डेसॉल्टचा फाईटर जेटचा प्रकल्प, पतंजली समूहाचा सुमारे पाच हजार कोटीचा प्रकल्प यांची पायाभरणी झाली असून आता एच.सी.एल. या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचा प्रकल्प प्रस्थापित झाल्याने नागपूर शहराचा एकात्मिक विकास होण्यास मदत झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. एच.सी.एल. टेक्नॉलॉजीच्या नागपूरातील मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात सुमारे 50 एकरवर पसरलेल्या कॅम्पसच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एच.सी.एल.चे संस्थापक शिव नायर, एच.सी.एल.चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजय कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भातील बेरोजगारी व गरीबीचा प्रश्न बिकट असून रोजगार निर्मितीकरीता मिहानमध्ये स्थापन झालेला एच.सी.एल. चा प्रकल्प विदर्भातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. विदर्भ व नागपूरातील अभियांत्रिकी महाविदयालयातील विदयार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग एच.सी.एल. साठी होणार असून एच.सी.एल. ला पायाभूत सुविधा तसेच संरचनेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र व राज्य सरकार करेल, असे आश्वासन श्री. गडकरी यांनी यावेळी दिले. एच.सी.एल.ने दुस-या टप्प्यात 12 हजार युवकांना रोजगार निर्माण होईल या दिशेने कार्य सुरू केले पाहिजे, असे त्यांनी सुचवले. नागपूरच्या मिहान परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्मितीनंतर नागपूर हे शहर जगाच्या सर्व भागाशी जोडले जाणार आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता एच.सी.एल. चा नागपूरातील प्रकल्प विकसित होईल, अशी आशा व्यक्त करून या प्रकल्पाचे संस्थापक शिव नायर यांच्या सामाजिक बांधिलकीचेही गडकरी यांनी यावेळी कौतुक केले.
नागपूरातील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्याचे धोरण एच.सी.एल. ने आखल्याने नागपूरातील आय.टी. क्षेत्र एच.सी.एल. सोबत समृद्ध होईल. मेट्रो (टायर -1) शहरासारखीच बुद्धिमत्तेची संपन्नता ही टायर-2 शहरातील युवकांकडे असून एच.सी.एल. मार्फत या युवकांच्या कौशल्याला विकसित व प्रशिक्षित करण्याचे कार्य केले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने एच.सी.एल. ने नागपूरात प्रकल्पाची पायाभरणी केली, या बाबीचा मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्र शासनाने वित्तीय क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा अवंलब करण्यासाठी ‘फायनांशियल टेक्नोलॉजी-फीनटेक’ धोरणाचा स्वीकार केला असून पुणे, नाशिक, औरंगाबाद या सारख्या शहरांमध्ये व्यापारवाढीसाठी ‘फीनटेक’ चा उपयोग होईल. आय. टी. क्षेत्रातील कर्मचा-यांना एकाच जागी रोजगार व रहिवास याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘आय.टी. टाऊनशीप्स’ ची ही स्थापना करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी याप्रसंगी जाहीर केले.
मुंबई, पुण्यानंतर महाराष्ट्रात नागपूरमध्ये एच.सी.एल.चा स्थापन झालेला हा तीसरा प्रकल्प असून नागपूरातील युवकांना रोजगारासाठी इतर शहरात स्थलांतर करण्याची आवश्यकता भासणार नाही. एच.सी.एल. कॅम्पसच्या आय.टी. कौशल्य प्रशिक्षणाअंतर्गत 100 विदयार्थ्यांची तुकडी सध्या प्रशिक्षण घेत आहे. एच.सी.एल. प्रकल्पाच्या संचालनाच्या पहिल्या टप्प्यात, 2000 युवकांना रोजगार देण्याचे आपले लक्ष्य आहे, असे एच.सी.एल. चे प्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी सी. विजय कुमार यांनी यावेळी सांगितले. नागपूरातील युवकांना येथेच रोजगाराची संधी मिळत असल्याने जागतिक आय. टी. पटलावर नागपूरला आणण्याचे स्वप्न साकार होईल, अशी आशाही विजय कुमार यांनी यावेळी व्यक्त केली.
एच.सी.एल. च्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणा-या 100 विदयार्थ्यांच्या तुकडीचे याप्रसंगी मान्यवरांसोबत समूह छायाचित्रही घेण्यात आले. या उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन एच.सी.एल. टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी केले. या कार्यक्रमास नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, हिंगण्याचे आमदार समीर मेघे, एच.सी.एल. चे पदाधिकारी, शहरातील अभियांत्रिकी महाविदयालयाचे विदयार्थी तसेच त्यांचे पालक, मिहान व एम.आय.डी.सी. चे अधिकारी उपस्थित होते.