नागपूर: आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महाग होत असल्याचे लक्षात घेऊन गरीब व मध्यवर्गीय माणूस पैसा नाही म्हणून उपचार घेऊ शकणार नाही, किंवा पैशा नाही म्हणून खितपड पडून राहील अशी स्थिती येऊ नये म्हणून शासनाने मुख्यमंत्री निधीतून गरीब व मध्यमवर्गीयांना तात्काळ आरोग्य उपचारासाठी आतापर्यंत 500 कोटींची मदत केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली.
महाराष्ट्र शासन आणि स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेच्या वतीने अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस रेशीमबाग येथे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय महामार्ग, रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, खा. विकास महात्मे, खा. संचेती, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, मनीषा कोठेकर, शिबिर आयोजनाचे प्रमुख माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सुभाष पारधी, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, रामेश्वर नाईक, बंडू राऊत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- औषधोपचार व शस्त्रक्रियांवर होणारा महागडा खर्च गरीब व सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही. आरोग्य सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे अनेक कुटुंबांना खितपत पडावे लागते किंवा मृत्युमुखी पडावे लागते. ही अवस्था पाहूनच शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरीबांना औषधोपचारांचा लाभ देण्याचे ठरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आजारांवर औषधोपचार करता यावा म्हणून 5 लाखाचा आरोग्य विमा देण्याची योजना सुरु केली. यामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना एक सुरक्षा कवच मिळाले आहे. मुख्यमंत्री निधीतून औषधोपचारासाठी आतापर्यंत नागपूर जिल्ह्याला 40 कोटी व राज्यात 500 कोटींची मदत शासनाने केली आहे. आरोग्यासाठी व्यथित होण्याची गरज नाही. शासन गरीब व मध्यवर्गीयांच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. गेल्या 4 वर्षात या शासनाने सर्वाधिक खर्च केला आरोग्याच्या योजनांवर केला असून जिल्ह्याजिल्ह्यात महाशिबिरे घेण्यात येत आहेत. या शिबिरासाठी कोणताही शासकीय निधी वापरला जात नाही. आमचे कार्यकर्ते आणि समाजातील दानशूर लोक स्वत:हूनच पुढे येत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
शिबिर आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रवीण दटके यांनी यांनी सांगितले की, 50 हजार रुग्णांची नोंदणी झाली असून ज्यांना त्वरित तपासण्यांची गरज आहे, अशा रुग्णांच्या तपासण्या नि:शुल्क करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय शिबिराबद्दलची अन्य माहिती त्यांनी सांगितली. या शिबिरासाठ़ी नागपूर, पुणे, मुंबई येथून तज्ञ डॉक्टर आले असून त्यांच्याद्वारा रुगणांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. शिबिरात तपासणी झाल्यानंतर रुग्णाला योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या डॉक्टरमंडळींचा मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न शासनासमोर