नागपूर : आजच्या धावपळीच्या युगात नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. कामाची व्यस्तता आणि तंत्रज्ञानाने जीवन व्यापल्याने वाहनांचा वापर वाढला आहे. अशात चालणे, धावणे अशी सहज होणारी व्यायामही होत नाही. मात्र आयुष मंत्रालय व नागपूर महानगरपालिकेने आरोग्याबाबत जागृतीसाठी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून आपले नागपुरकरांची आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याचे दर्शविते. प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रती सदैव जागरुक असावे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्ली द्वारा संचालित क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थानच्या वतीने तिसऱ्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ४) कस्तुरचंद पार्क येथून ‘हेल्थ रन’ (आयुर्वेदा दौड स्वास्थ की ओर) चे आयोजन करण्यात आले. ‘हेल्थ रन’च्या समापनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद माने, सीसीआरएएसचे महासंचालक के.एस. धिमान, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थानचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा, व्हीएनआयटीचे संचालक विश्राम जामदार, प्रो-हेल्थ फाउंडेशनचे डॉ. अमीत समर्थ, सीसीआरएएसचे राकेश कुमार, सीसीआयएमचे अध्यक्ष जयंत देवपुजारी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक रवी कुमार, डॉ. मितेश रामभिया, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, नागपूर आरोग्य भारतीचे डॉ. रमेश गौतम, आयुर्वेद व्यासपीठचे डॉ. शिशीर गोस्वामी उपस्थित होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सुदृढ आरोग्याशिवाय कोणतिही गोष्ठ शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडा वेळ आपल्या आरोग्यासाठी द्यावा. आयुर्वेदाच्या माध्यातून आरोग्याबाबत होत असलेल्या जनजागृतीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. यावेळी ‘हेल्थ रन’मध्ये सहभागी स्पर्धकांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
‘सार्वजनिक आरोग्यात आयुष’ (AYUSH in public health) ह्या संकल्पनेवर ही दौड घेण्यात आली. खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे व महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरूवात केली. पाच किलोमीटर आणि आठ किलोमीटर अंतरासाठी घेण्यात आलेल्या या दौडमध्ये सुमारे पाच हजारावर स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी क्षेत्रिय आयुर्वेदीय मातृ व शिशु स्वास्थ अनुसंधान संस्थानचे अधिकारी डॉ. आर. गोविंद रेड्डी, डॉ. सविता शर्मा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आभार ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी मानले.