नागपूर : महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करत आंदोलन केले. राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. औषध खरेदीसाठी गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक फाटका बसत आहे.
शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे गोर-गरिबांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून आज हे आंदोलन करण्यात आल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
तोंडाला मास्क गळ्यात स्टेथोस्कोप घालून आणि स्ट्रेचर आणून विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. ‘जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ नाही औषध नाही गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी,’ ‘शासकीय रुग्णालयात नाहीत डॉक्टर नाहीत नर्सेस, त्यामुळे वाढताहेत मृत्यूच्या केसेस’ अशा सरकारविरोधात घोषणा विरोधकांनी दिल्या.
गेल्या चार महिन्यांत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४३६ मृत्यू, नांदेडमध्ये २४ मृत्यू, ठाणे-कळवा येथे २४ आणि छत्रपती संभाजीनगर येथेही २४ मृत्यू झाल्याच्या आकडेवारीकडे विरोधकांनी लक्ष वेधले.
दरम्यान या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, विकास ठाकरे, सतेज पाटील, यशोमती ठाकूर आदींचा सहभाग होता.