मुंबई : शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुद्दामहून निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप करत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे.
यातच राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १३ तारखेला होणार होती, ती आता १२ तारखेला घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. १३ तारखेलाच सर्वोच्च न्यायालयात देखील ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. मात्र दिल्लीतील P20 च्या नियोजित कार्यक्रमामुळे विधानसभेतील सुनावणी १२ तारखेला घेणार असल्याचे कारण नार्वेकर यांनी दिले आहे.
आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावरील सुनावणी मी उशिरा नाही तर लवकरच घेत आहे. तसेच मी या विषयावर दिरंगाई करणार नाही. शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट यांच्या आमदार अपात्रता याचिकांवर सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी चालू आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावल्यामुळे कुठला पक्ष खरी शिवसेना, कुणाचा व्हीप वैध या मुद्द्यांचा सोक्षमोक्ष अध्यक्षांनी लावणं अपेक्षित आहे.