Published On : Fri, Mar 1st, 2024

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर ७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

Advertisement

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर आता पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे. .विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला होता. शिवसेना पक्षामध्ये जून 2022 मध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांनीही खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असा निकाल दिल्यानंतर त्याला ठाकरे गटाकडून आव्हान देण्यात आले असून आता कोर्टात पुन्हा वाद-प्रतिवाद होणार आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ठाकरे गटाची याचिका आज 1 मार्च दिवशी ठेवण्यात आली होती. ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिकेचा उल्लेख केला आणि ते कामकाजाच्या यादीत नसल्याचे सांगितले. न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या खंडपीठाला ते ७ मार्चला सूचीबद्ध करावे, अशी विनंती त्यांनी केली.

Advertisement

विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारी रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली. त्यानंतर न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर त्याची यादी करण्याचे आदेश दिले होते. शिंदे यांनी “चूकीच्या पद्धतीने सत्ता बळकावली” आणि महाराष्ट्रात “असंवैधानिक सरकार” चालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.