नागपूर : राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असून, विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत विदर्भात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहील. तर दक्षिण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात संध्याकाळनंतर तापमानात वाढ होईल, असे संकेत मिळत असून, येत्या काही दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पारा चाळिशी पार गेला आहे.
मुंबई आणि उपनगरांतही उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. हवामान खात्याने नागरिकांना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्याबरोबरच देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानातील काही भागांत तापमान 45 अंशांहून अधिक नोंदवले गेले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.