नागपूर – विदर्भात उन्हाने उग्र रूप धारण केले असून, पुढील काही दिवसात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गुजरात आणि उत्तर-पश्चिम भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमान झपाट्याने वाढत आहे. मागील आठवड्यात थोड्याशा पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला होता. मात्र आता आकाश पुन्हा एकदा पूर्णपणे साफ झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे.
अकोल्यात तापमान ४३ अंशांवर-
पश्चिम विदर्भातील अकोल्यात तापमान आधीच ४३ अंशांवर पोहोचले असून नागपूरचाही पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदवला जात आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत विदर्भात ४ ते ५ अंशांनी तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे.
१२ एप्रिलपासून काही भागांत हलक्या पावसाची शक्यता-
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १२ एप्रिलपासून दक्षिण-पूर्व विदर्भात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांनी उष्णतेपासून काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.