नागपूर : हवामान विभागाकडून विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या म्हणजेच रविवारी (16 मार्च) अकोल्यात ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिना संपताच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं समोर आलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्या ठिकाणी अति उष्णता असेल, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सद्या विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्याचा पारा हा 40 डिग्रीच्या पार पोहचला आहे.
अशातच आज (15 मार्च) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपुर (41.4) ब्रम्हपुरी (41.2) आणि वर्धा येथ 41 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काळात हेच तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितले जात आहे. साधारण 35 अंशांच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटाला विदर्भातील असतं. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेनं शहरं आणखी तापण्याची शक्यता आहे.