नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटक वाहनांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांचा दोन्ही बाजूने मार्ग रोखल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पर्यटनाच्या नावावर अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली.
पर्यटकांकडून वाघांची अडवणूक हे वनविभागाचे अपयश आहे. घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नव्हे तर प्रसार माध्यमांकडून कळते, असे न्यायालयाने म्हटले आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ३१ डिसेंबरला पर्यटकांनी वाघांचा रस्ता अडवला होता. ५ जानेवारी रोजी याबाबत प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता.
वाघांची अडवणूक ही अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. संबंधित क्षेत्र संचालकांनी सुरुवातील याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवला आणि घटनेतील आरोपी असलेले जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांना सात दिवसांसाठी निलंबित केले. मात्र न्यायालयाने दखल घेतल्यानंतर आरोपींच्या निलंबनाचा कालावधी तीन महिने करण्यात आला आहे. तसेच दोषींवर वनविभाग पुढे काय कठोर कारवाई करणार आहे, असा सवालही न्यायालयाने केला.
दरम्यान ‘एफ २’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांना ३१ डिसेंबरला पर्यटकांच्या वाहनांनी बराच वेळ घेरले होते. या वाघिणीची व तिच्या बछड्यांची वाट रोखून धरली होती. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कुही वनक्षेत्रातील गोठणगाव सफारी मार्गावर ही घटना घडली.