मुंबई : महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या योजनेसाठी जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले आहे.
लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
योजनेविरोधातील याचिकेत 14 ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आज मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली.
या सुनावणीत सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती.
लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय, त्याला आव्हान कसं देता येईल? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला आहे.