Published On : Thu, Mar 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

हिंदू गर्जनेने आसमंत निनादत रहावे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठमोळ्या थाटात हिंदू नववर्षाचे स्वागत : नागपूरकरांची उत्स्फूर्त गर्दी | अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, गिरीजा ओक यांची उपस्थिती
Advertisement

नागपूर: मराठमोठ्या पारंपरिक पेहरावातील चिमुकले, महिला आणि नागरिक. प्रभू श्रीरामाच्या पालखीचे संचालन करणाऱ्या ढोलताशा पथकांची प्रत्येक उपस्थितांना ठेका धरायला लावणारी धून. अस्सल मराठमोळ्या नऊवारीत सजलेल्या कलषधारी महिला. रामायणातील पात्रांची वेशभूषा साकारलेले चिमुकले, वेशभूषेसह अश्वारूढ बालशिवाजी, नऊवारीत अश्वारूढ होऊन चित्तथरारक शिवकालीन प्रात्यक्षिक सादर करणारी चिमुकली, मराठमोळ्या वेशभूषेतील स्केटर्स, आखाडा दानपट्टा सादर करणाऱ्या तरुणी, बाहुबली हनुमंताची अनोखी शैली पाहण्यासाठी उपस्थितांची लगबग, लेझीम ताशाच्या तालात तात्या टोपे सभागृहापासून लक्ष्मीनगर चौकाकडे पुढे सरकत जाणारी प्रभू श्रीरामाची शोभायात्रा, ठिकठिकाणी शोभायात्रेवर होणारा फुलांचा वर्षाव, हा नेत्रदिपक सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाललेली लहानथोरांची लगबग आणि आसमंत निनादून टाकणारा ‘जय श्रीराम’चा जयघोष…

अशा मंगलमय, उत्साहपूर्ण, चैतन्यदायी वातावरणात नागपूर शहरात हिंदू नववर्षाचे स्वागत झाले. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगर चौकामध्ये ५१ फूट उंच गुढी उभारून नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन नागपूकरांचा उत्साह वाढविला.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहराचे माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट झिल्पी तसेच लक्ष्मीनगर, बजाजनगर, सुरेंद्रनगर भागातील विविध संस्थांच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तात्या टोपे सभागृहाजवळील श्री गणेश मंदिरातून शोभायात्रेला सुरूवात झाली व लक्ष्मीनगर चौकात कार्यक्रमानंतर सांगता झाली.

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता, प्रभू श्रीराम, पवनसूत हनुमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून शोभायात्रेत सहभागी नागपूरकरांचा उत्साह द्विगुणीत केला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मा. उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीला आणि येथील परंपरेला प्रदीर्घ इतिहास असून ही संस्कृती आणि संस्कार जपले जाणे आवश्यक आहे. नवीन पिढीच्या भविष्याकरीता संस्कृतीची जपणूक होणे आवश्यक असल्याचे नमूद करीत श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती संवर्धनासाठी घेण्यात आलेल्या संदीप जोशी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले व संपूर्ण आयोजक मंडळाचे अभिनंदन केले. त्यांनी शोभयात्रा उत्तरोत्तर वाढत जावी व हिंदू गर्जनेचा निदान आसमंती सदैव निनादत रहावा, असे गौरवोद्गार काढून सर्व नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी व गिरीजा ओक यांनी गुढीचे पूजन केले. याप्रसंगी श्री सिध्दीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री संदीप जोशी उपस्थित होते. गुढी पूजनानंतर हनुमान चालीसा म्हणण्यात आली. यानंतर श्रीरामरक्षा स्तोत्र पठण झाले.

अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही ‘जय श्रीराम’च्या जयघोषात नागपुरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी नववर्षाचा सोहळा पाहिला पण नागपुरात जे अनुभवलं ते कुठेही अनुभवलं नसल्याची कबुली देत त्यांनी हनुमान चालीसा व रामरक्षा स्तोत्र पठण या संकल्पनेचे कौतुक केले. नववर्षाला मुंबईतही हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पठण करू, असेही त्या म्हणाल्या.

सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री गिरीजा ओक यांनी नागपुरकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना आपणही नागपुरकरच असल्याचे नमूद केले. त्यांचा जन्म नागपुरातील असून आजी लोकांच्या शाळेत शिक्षिका असल्याचे त्यांनी सांगितले. आजोळी येऊन नवीन वर्ष साजरा करताना प्रचंड आनंद होत असल्याचीही भावना गिरीजा ओक यांनी व्यक्त केली.

नागपूर शहराचे माजी महापौर श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी यांनी देशात घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्यातील ‘स्व’ जागा करणे आणि निद्रावस्थेत असलेल्यांना जागविण्यासाठी हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. त्यांनी नववर्ष स्वागत सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले. आरतीने नूतन वर्ष अभिनंदन सोहळ्याची सांगता झाली.

नूतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री शंतनू येरपुडे, गजानन निशितकर, मनोज देशपांडे, जयंता आदमने, प्रकाश रथकंटीवार, मनोज देशपांडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, सौ. काजल बागडी, अनुसया गुन्ता, डॉ. माधुरी इंदुरकर आदींनी नववर्षाच्या स्वागत समारंभासाठी परिश्रम घेतले.

Advertisement