अलीगढ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सध्या अलीगढच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असून, या प्रवासात त्यांनी स्वयंसेवकांना सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवण्याचा मोलाचा संदेश दिला आहे.
स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत म्हणाले की, “हिंदू समाजाने ‘एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी’ या तत्वाला स्वीकारणं आवश्यक आहे. या विचारातून खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचा मार्ग मोकळा होतो.” ते पुढे म्हणाले की, सामाजिक ऐक्य हे केवळ देशांतर्गत महत्त्वाचं नाही, तर जागतिक शांततेसाठीदेखील आवश्यक आहे.
मोहन भागवत यांनी अधोरेखित केलं की, भारतीय समाजाचे मूळ संस्कार, परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. या आधारावर समाज अधिक सुदृढ आणि ऐक्यपूर्ण होऊ शकतो. “खऱ्या ऐक्याविना जागतिक स्तरावर शांततेसाठी भारत आपली जबाबदारी पार पाडू शकणार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांना आपल्या घरांमध्ये आमंत्रित करण्याचं आवाहन केलं. “घर हा समाजाचा प्राथमिक घटक असून, याच माध्यमातून संस्कारांचं रोपण केलं जातं,” असं ते म्हणाले.
सणांच्या संदर्भात भागवत यांनी एकत्रित उत्सव साजरे करण्यावर भर दिला. “सणांमध्ये सर्वांचा सहभाग असेल तर त्यातून राष्ट्रीय भावना आणि सामाजिक एकजूट बळकट होते,” असं ते म्हणाले.
या दौऱ्यात मोहन भागवत विविध शाखांमध्ये सहभागी होत असून, संघाच्या प्रचारकांशीदेखील त्यांच्या महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहेत. हा दौरा आरएसएसच्या २०२५ मध्ये होणाऱ्या शताब्दी महोत्सवाच्या तयारीचा भाग असल्याची माहिती मिळाली आहे.