वर्धा : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड (Wardha Hinganghat) प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे (Vikki Nagrale) याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात (Murder) दोषी ठरवले होते. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते.
या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.