नागपूर : मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक परंपरा असून 143 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या जल्लोषात शहरात साजरा केला जातो. शहरात काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्यात येते. या दोन्ही मारबतला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पोळा सणाच्या चार दिवसांपूर्वी पिवळी आणि काळी मारबतची स्थापना केली जाते. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजलं जातं. काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.
ऐतिहासिक वारसा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुराने 143 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरा आजही जोपासली जाते. समाजातील अनिष्ट प्रथांना बगल देण्यासाठी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रुढी- परंपरा,अंधश्रद्धेच दहन करणे आहे. कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक काळी मारबत आहे, तर लोकांचं रक्षण करणारी पिवळी मारबत आहे. यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात. त्यांची मिरवणूक काढण्यात येते आणि त्यानंतर त्यांचे दहन केले जाते.
पिवळी मारबतीचे महत्त्व : नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. लोकांच्या रक्षणासाठी पिवळी मारबतीची मिरवणूक काढली जाते. या मारबतचे दर्शन करायला अनेक नागरिक गर्दी करतात. यंदा पिवळ्या मारबतीला 139 वर्ष पूर्ण झाले आहेत
काळी मारबतीचे महत्त्व : भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्याविरोधात काळी मारबत काढली जाते. आज काळी मारबत या परंपरेला 143 वर्ष पूर्ण झाले असून वाईट प्रवृत्तींचा नाश करणे हा या मागचा हेतू आहे.