नागपूर : नागपूर येथील दीक्षाभूमी, शांतीवन चिंचोली व ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी येथील विविध विकासकामे खोळंबलेली असून या स्थळांना शासनाने दिलेल्या निधी संबंधी प्रशासकीय आढावा बैठक घेउन अडचणी मार्गी लावाव्यात, अशी मागणी भाजपा प्रदेश प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. बौद्ध अनुयायांच्या उपरोक्त तिनही श्रद्धा स्थळांच्या विकासासंबंधी त्यांनी शिष्टमंडळासह ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे व प्रदेश सचिव अर्चना डेहनकर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथील दीक्षाभूमी, शांतीवन चिंचोली व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल या ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी या स्थळांच्या विकासासाठी भरघोष निधी दिला आहे. याशिवाय केंद्र शासनासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन द्वारे सुद्धा विकास निधी तिनही स्थळांना प्राप्त झालेला आहे.
मात्र पर्याप्त निधी प्राप्त होत असतानाही या तिनही स्थळांच्या विकासाचे कार्य अनेक वर्षांपासून रखडलेलेच आहे. त्यामुळे समाजातही असंतोषाची भावना आहे. असंख्य बौद्ध, आंबेडकरी अनुयायांच्या भावनेशी निगडीत तिनही स्थळांच्या विकासाची गती संथ होण्यामागील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करून विषय मार्गी लावण्यासाठी यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे ॲड. धर्मपाल मेश्राम व शिष्टमंडळाने केली.
ॲड. मेश्राम यांच्या मागणीवर दखल घेत प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाला तात्काळ प्रशासकीय बैठक बोलावण्याचे निर्देशित केले.