नागपूर : भारताच्या चांद्रयान-3 या मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण चांद्रयान-3 यान आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब असून यानाच्या सर्व सिस्टिमची वेळोवेळी पाहणी केली जात आहे.
यापार्श्वभूमीवर चांद्रयान ३ च्या याशासाठी आज नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट)वतीने हवन आणि गणेश वंदना करण्यात येत आहे.
इस्रोच्या माहितीनुसार यानातील सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरू आहेत. मात्र, संशोधकांना शेवटच्या 17 मिनिटाची भीती वाटत आहे. या 17 मिनिटात कोणती चूक तर होणार नाही ना? याची काळजी संशोधकांना आहे.
दरम्यान इस्रोने चांद्रयान-3ची स्पीड आणि त्याच्या दिशेकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी लाइव्ह ट्रॅकर लॉन्च करण्यात आले. यावरून अंतराळात चांद्रयान-3 कुठे आहे हे दिसून येणार आहे. लँडिंगनंतर विक्रम सुरू होईल आणि कम्युनिकेट करू लागेल. नंतर रँप उघडेल आणि प्रज्ञान रोव्हर रँपमधून चंद्राच्या पृष्ठभागावर येईल. विक्रम लँडर प्रज्ञानचे फोटो काढेल आणि हे फोटो पृथ्वीवर पाठवणार आहे.