नागपूर : नागपूर महानगरपालिकेने शासनाचे निर्देशानुसार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी होणारे लग्न कार्याला अनुमती प्रदान केली आहे. तथापि हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यास अनुमती दिलेली नाही.
महाराष्ट्र शासनाचे दि. ३१ मे २०२० आणि नागपूर महानगरपालिकेचे दि. ५ जून २०२० ला “मिशन बिगीन अगेन” संबंधी निघालेल्या आदेशानुसार जास्तीत-जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत घरी आयोजित होणारे लग्न कार्याला अनुमती प्रदान करण्यात आली आहे यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तथापी सदर आदेशात हॉल, मंगल कार्यालय किंवा तत्सम सभागृह इ. प्रतिबंधित बाबीत नमूद असल्याने अशा ठिकाणी कोणतेही समारंभ आयोजित करणे बेकायदेशीर आहे, असे म.न.पा.व्दारे कळविण्यात आले आहे.
तथापी शहरात वाढती कोरोना बाधीत रुग्णांची संख्या लक्षात घेता शक्यतो कोणतेही समारंभ / कार्यक्रम आयोजित करणे टाळावे तथापी जरी लग्नसमारंभासाठी ५० लोकांची परवानगी अनुज्ञेय असली तरी सार्वजनिक आरोग्याचे हितास्तव कमीत-कमी संख्या ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.