नागपूर : नागपूर पोलिसांतर्फे सुरू केलेला ‘होमड्रॉप’ उपक्रम स्थायी स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्यमंत्री गृह (शहरे), सतेज पाटील यांनी आज रविभवन येथील बैठकीत दिले. पदभार स्वीकारल्यांनतरची नागपूर येथील पहिली आढावा बैठक त्यांनी घेतली.
रात्री दहा वाजल्यानंतर महिलांना वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना ‘होमड्रॉप’ या सुविधेद्वारे महिला पोलिसांसह त्यांच्या घरी पोहोचविण्यात येते. या सुविधेला महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या महिन्यात 67 महिलांना घरी सुखरूप पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. यावर महिलांना रात्री सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी केलेली ‘होमड्रॉप’ ही सुविधा उत्तम असून ही स्थायी स्वरुपात करण्याची सूचना गृहराज्यमंत्री श्री.पाटील यांनी केली.
2019 मधील गुन्ह्यांची माहिती, डिटेक्शन टक्केवारी, प्रतिबंधक कारवाई, पोलिसांनी राबविलेले उपक्रम व भविष्यातील नियोजनाची माहिती आयुक्तांनी दिली.
2018 च्या तुलनेत 2019 मध्ये एकूण गुन्ह्यांत दहा टक्क्याची घट झाली आहे. 2019 मध्ये एमपीडीए व 33 इसमांना स्थानबद्ध करण्यात आले होते. तर ‘मकोका’ अंतर्गत 2019 मध्ये 13 गुन्हेगारी टोळ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
भरोसा सेल, हितगुज कार्यक्रम, छात्र पोलिस उपक्रम, केअर, कम्युनिटी पोलिसींग आदी उपक्रमाबाबत श्री.पाटील यांनी जाणून घेतले.
यावेळी नियोजनाने व चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही गृहराज्यमंत्री महोदयांनी दिल्यात. या बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सह पोलिस आयुक्त रविंद्र कदम, पोलिस अधीक्षक राकेश ओला यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.