नागपूर : घरमालक तरुणाने भाड्याने राहणाऱ्या दाम्पत्याच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी . प्रतिक आसोले (२०) याला अटक केली आहे.
पीडित भाडेकरू १४ वर्षीय मुलगी आठव्या वर्गात शिकते. ती सावत्र वडील आणि आईसोबत भाड्याच्या घरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून घरमालक प्रतिक आसोले हा त्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता. तो तिला वारंवार छळत होता.
आईवडील घरी नसताना वारंवार घरी येऊन तिच्याशी अश्लील संवाद साधायचा. शुक्रवारी सकाळी मुलीचे आईवडील कामावर निघून गेले. प्रतिकने त्या मुलीला घरी एकटी बघून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्याशी जबरन बलात्कार केला. पीडित मुलीने घटनेसंदर्भात आईला सांगितले.
मात्र आईने घर खाली करायला सांगणार या भीतीने आरोपी घरमालका विरोधात तक्रार दाखल केली नाही. दुसऱ्या दिवशी तरुणी शाळेत गेल्यानंतर तिने शिक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. शिक्षकाने तिच्या पहिल्या वडिलांना शाळेत बोलावून माहिती दिली. त्याने पत्नीला मुलीसोबत सक्करदरा पोलीस ठाण्यात पाठवून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रतिकला बेड्या ठोकल्या आहे.