काँग्रेस पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल माजी आमदार आशीष देशमुख यांची काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षातून हकालपट्टी केली. काल देशमुख यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. मात्र काँग्रेसची साथ सोडताना त्यांनी पक्षावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष जुना झाला, म्हातारा झाला असे शब्द देशमुख यांनी वापरले. मात्र आपल्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पक्षाने आपल्या वडिलांना आणि आपल्याला काय दिले हे मात्र देशमुख विसरले असल्याचे दिसते. त्यामुळे मा. आशिष देशमुख … आई म्हातारी झाली की तिलाही सोडून देणार का ? असा प्रश्न विचारावासा वाटत आहे.
आशिष देशमुख यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. 2018 मध्ये देशमुख यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमधील आक्रमक चेहरा म्हणून पक्षाने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘गांधी घराण्याशी देशमुख कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. तसंच आता पुढची दिशा ही गांधींच्या विचारधारेनुसार आणि तत्वांवर असेल. मला राष्ट्रीय पातळीवर काम करायचे आणि त्यानुसार माझे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत त्यावेळी आशिष देशमुख यांनी काँग्रेसचा हात धरला. त्यामुळे आशिष देशमुख यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवतन कोणतीच दिले नव्हते. ते सहखुशीने पक्षात आले.
इतकेच नाही आशिष देशमुख यांचे वडील माजीमंत्री व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची राजकीय कारकीर्दही चांगलीच गाजली आहे. त्यांनीही नेहमी काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम केले. देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडून भागभांडवल जमा करून रोहणात खांडसरी साखर कारखाना काढला त्यांनी तो स्वतःच फस्त केला. खाप्यात सूतगिरणी सुरू करण्याआधीच जमीन हडपली. हेटीसुर्लाची जमीन मातीमोल दरात खरेदी करून स्वतःच्या शैक्षणिक संस्था पोसण्यासाठी वापरली. देशमुख यांनी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, त्यांचा सातबारा अद्याप कोरा झालेला नाही. इतकेच नाही तर नागपुरात रुग्णालयही उभारले.शेवटी देशमुखांकडे इतका पैसा आला कुठून हा प्रश्न उपस्थित होतो.
गेल्या अनेक वर्षांपासून आशीष देशमुख यांचे राजकीय अस्तित्व अस्थिर असल्यासारखे आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप असे त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरु असते. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासूनच देशमुख यांची सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी धडपड सुरु होती. जिकडे सत्ता तिकडे देशमुख चित्र सर्वांनाच दिसत आहे.
काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख कुठे जाणार याची चर्चा सुरू होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे ते भाजपत जाणार हे निश्चित झाले होते. मात्र सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका करणे म्हणजे ‘जिस थाली में खाया उसी में छेद किया’ या म्हणी सारखे झाले आहे.