मुंबई: राज्यातील चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चर्मकार आयोगाची स्थापना करण्यात येणार असून या आयोगाच्या माध्यमातून समाजाच्या अडचणी दूर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि रोहिदास पंचायत संघ, मुंबई यांच्या वतीने परळ येथे उभारण्यात येणाऱ्या संत रोहिदास भवनाच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, आमदार भाई गिरकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर, मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, स्नेहल अंबेकर, रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबईचे अध्यक्ष मयुर देवळेकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशात संत रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरु केली. त्याच माध्यमातून समाज एकत्र केला. त्यांच्या विचारातूनच ‘सबका साथ सबका विकास’ ही संकल्पना तयार झाली आहे. समताधिष्ठित राज्याचा त्यांचा विचार होता. त्याच विचारावर शासन काम करीत आहे. संत रोहिदास यांच्या कार्याला आणि विचाराला समर्पित तसेच देशाला अभिमान वाटेल असे संत रोहिदास भवन येथे उभारण्यात येईल. समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. गटई कामगारांना प्रशिक्षिण देण्यात येऊन त्यांच्या रोजगारासाठी पुन्हा टपरी शेड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त जागा देण्याचे निर्देशही दिले आहे. चर्मकार समाजाच्या सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच रोहिदास समाज पंचायत संघाने ज्या मागण्या केल्या आहेत त्यावर शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. बडोले म्हणाले, मुंबईत उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवनच्या धर्तीवरच राज्यात प्रत्येक विभागात संत रोहिदास भवन उभारणार आहे. या भवनामध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह, ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबईचे अध्यक्ष मयुर देवळेकर यांनी चर्मकार समाजाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.