नागपूर :वनविभागाचे एकात्मिक सबलीकरण बाबत मा. ना. श्री. गणेश नाईक, मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर दोन दिवसीय आढावा बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. त्याचा शुभारंभ आज दिनांक ०९/०४/२०२५ रोजी नागपूर स्थित हरिसिंग सभागृह सेमिनरी हिल्स, नागपूर येथे करण्यात आला.
मा. ना. श्री. गणेश नाईक, मंत्री (वने) यांनी सर्वप्रथम सकाळी राज्याचे मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय (वनबल प्रमुख) यांचे कार्यालय वनभवन, नागपूर येथे भेट दिली. यावेळी मा. मंत्री महोदय हे वनमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भेट देत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मा. मंत्री महोदयांचे स्वागत केले, त्यावेळी मा. मंत्री महोदय यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला.
या दोन दिवसीय आढावा बैठकीत वनविभागाचे संरचनात्मक विस्तारीकरण, आर्थिक व कार्यात्मक सबलीकरण संदर्भात विभागाचे विविध शाखांचे वरिष्ठ वनाधिकारी सादरीकरण करणार आहेत. आजच्या आढावा बैठकांमधून वन विभागामध्ये पायाभूत व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव पाठवण्याची सूचना नामदार गणेश नाईक यांनी केली. त्याचबरोबर विभागाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने पदभरती आणि कार्यालयांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही माननीय वन मंत्री महोदयांनी दिले.
आढावा बैठक शुभारंभ प्रसंगी श्री. मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वने), श्रीमती शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), श्री. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), श्री. संजीव गौड, व्यवस्थापकीय संचालक, वनविकास महामंडळ, श्री. विवेक खांडेकर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( उत्पादन व व्यवस्थापन ), श्री.ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग), श्री. प्रविण चव्हाण, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा), श्री. नरेश झुरमुरे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी), तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.