Published On : Fri, Aug 6th, 2021
By Nagpur Today Nagpur News

कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान हा येणा-या संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देणारा : महापौर

Advertisement

– धरमपेठ झोनमध्ये कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार

नागपूर: कोव्हिड या भीषण महामारीने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले. नागपूरातही या विषाणूचा चांगलाच प्रादुर्भाव होता. त्यात पहिल्या लाटेत शहरात रुग्णसंख्या जास्त होती. अशा स्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी एकीकडे तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे होत असलेल्या नागरिकांना जेवण व जेवणाचे साहित्य पुरविण्यासाठी पुढे आलेले सेवाभावी नागरिक आणि सामाजिक संस्था या सर्व व्यक्तींचे कोरोना योद्धे म्हणून गौरव होणे ही अभिमानाची बाब आहे. कोव्हिड योद्ध्यांचा होणारा हा सन्मान येणा-या प्रत्येक संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

Gold Rate
15April 2025
Gold 24 KT 93,500/-
Gold 22 KT 87,000/-
Silver / Kg - 95,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्य विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार यांच्या संकल्पनेतून गुरूवारी (ता.५) धरपेठ झोन कार्यालयामध्ये कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते.

मंचावर कार्यक्रमाचे संयोजक धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेविका रुपा राय, प्रगती पाटील, परिणीता फुके, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सर्वश्री अमर बागडे, विक्रम ग्वालबंशी, निशांत गांधी, प्रमोद कौरती, हरीश ग्वालबंशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, अनिरुद्ध पालकर, किरण मुंधडा, अमर पारधी यांच्यासह सुनील हिरणवार यांच्या मातोश्री व पत्नी यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारद्वारे लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. आपल्या शहरातही मनपा प्रशासनाद्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात आली. लोकांनी एकत्र येउ नये, त्यांचा कुणाशी संपर्क येउन त्यांना संसर्ग होउ नये या उद्देशाने लॉकडाउन लागू करण्यात आले. लोकांच्या जीवाची काळजी घेत पोलिस कर्मचारी दिवस, रात्र रस्त्यांवर उभे राहून कधी प्रेमाने तस कधी कठोर होउन लोकांना घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन करीत होते. पोलिस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत नसते तर लॉकडाउन यशस्वीही होउ शकले नसते व शहरातील रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येणारी नव्हती. याशिवाय लॉकडाउनळे शहरातील गोरगरीब, मजूर व सर्वसामान्यांचे झालेले हाल दूर करण्यासाठी त्यावेळी मनपाने अशा लोकांच्या भोजनाची जबाबदारी स्वीकारली होती. मनपाकडे स्वत:चे स्वयंपाकगृह नाही, अन्नधान्याचे साहित्य व अन्य बाबी नाही अशाही स्थितीत नागपूर महानगरपालिकेद्वारे ७० लाख फूड्स पॅकेट गरजूंना वितरीत करण्यात आले. हे कार्य केवळ शहरातील ३७८ सेवाभावी नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाले. या कार्याचे संपूर्ण श्रेय त्यांचेच आहे, असेही ते म्हणाले.

रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी डॉक्टर, परिचारीका इतर वैद्यकीय कर्मचा-यांमार्फत अहोरात्र सेवाकार्य बजावण्यात आले. शहरात लोकांनी सुरक्षित रहावे, स्वत: व इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क लावावे यासाठी मनपाचे उपद्रव शोध पथक सक्तीने कारवाई करीत होते. ही कारवाई सक्तीची असली तरी नागरिकांच्या जीवाचे मोल लक्षात घेउन नाईलाजाने त्यांना ही सक्ती करावी लागत होती. कोव्हिड संसर्गाच्या भीतीने कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या घरचेही व्यक्ती पुढे येत नसताना मनपाच्या सफाई कर्मचा-यांनी अंत्यसंस्काराचे संपूर्ण कार्य केले. याशिवाय शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुस्लीम संघटनेमार्फत हिंदू मृतदेहांचे हिंदू रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक आणि धार्मिक एकोप्याची साक्ष या संकटाच्या प्रसंगी आपल्या शहरातील संस्था आणि नागरिकांनी दिली. त्या नागरिकांचा अर्थात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा ही संकल्पना मांडून ती पूर्ण केल्याबद्दल झोन सभापती सुनील हिरणवार यांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी साजरा होउ न शकणारा कार्यक्रम योगायोगाने सुनील हिरणवार यांच्या वाढदिवशी साजरा झाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.

प्रास्ताविकामध्ये झोन सभापती सुनील हिरणवार यांनी सत्कार समारंभ आयोजनामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन संजिवनी चौधरी यांनी केले.

Advertisement
Advertisement