विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत चांगले संस्कारितही झाले पाहिजे : ना. गडकरी
नागपूर: शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान मिळविणे ही खूप मोठी उपलब्धी आहे. पण केवळ विद्वान, सुशिक्षित झाले म्हणजे होत नाही, तर विद्यार्थ्यांनी चांगले संस्कारितही झाले पाहिजे, चांगला माणूस व्हावा अशी महत्त्वाकांक्षाही असली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
हुडकेश्वर परिसरातील प्रसिध्द अशा सेंट पॉल हायस्कूलमधील दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेशचंद्र बंग, शाळेचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, अजय बोढारे, माजी आ. सुधाकर कोहळे, देवेंद्र दस्तुरे, सोनटक्के गुरुजी, शाळेच्या प्राचार्या व अन्य उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले. तसेच राजाभाऊ टाकसाळे यांनी अत्यंत मेहनतीने उच्च पध्दतीचे शिक्षण येथे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात राजाभाऊंनी चांगले काम केले आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान होय. महामार्गांच्या क्षेत्रात काम करताना मी 5 जागतिक विक्रम केले आहे. पण मी काही इंजिनीअर नाही. डिग्रीचा आणि कामाचा काही संबंध नसतो. त्यामुळे जीवनाच्या यशस्वीतेसाठी केवळ ज्ञान हवे असे नाही. पण ज्ञान मिळविणे आवश्यकही आहे. यासोबतच योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि योग्य दृष्टिकोनही आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षण हा एक प्रवाह आहे. शिक्षणावर होणारी गुंतवणहूक म्हणजे भविष्यात तयार होणार्या चांगल्या नागरिकावर होणारी गुंतवणूक होय, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- देशात मूल्याधिष्ठित जीवनपध्दती व मूल्याधिष्ठित शिक्षण पध्दती आपल्या समाजाची आवश्यकता आहे. संस्कार, संस्कृती व इतिहास या मूल्यांवर आपली जीवनपध्दती टिकून आहे. माणूस सर्वसामान्य असला तर प्रयत्न मात्र सुरुच असले पाहिजे. निराशा नको. सकारात्मकता आणि आत्मविश्वास असेल तर आपण यशस्वी व्हाल असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढच्या काळाच्या शुभेच्छा दिल्या.