नागपूर – नागपूर शहरातील वाठोड़ा परिसरात १४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी झालेल्या घरफोडी प्रकरणात गुन्हे शाखा युनिट क्रमांक ०४ ने वेगवान आणि अचूक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून सुमारे ३.६४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाठोड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनाथ नगर येथील प्लॉट क्र. १०० मध्ये राहणारे विठ्ठलराव रामकृष्ण डबरे (वय ६५) हे आपल्या कुटुंबासह एका लग्नकार्याला गेले होते. याच दरम्यान १४ एप्रिल रोजी दुपारी १:३० ते २:५७ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप व सेंट्रल लॉक तोडून, बेडरूममधील अलमारीतून ५ लाख रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७.९३ लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.
या घटनेबाबत वाठोड़ा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(३) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत गुन्हे शाखा युनिट क्र. ०४ च्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
मोहम्मद जागीर मोहम्मद शाहिद (वय २७), रा. समोसा ग्राउंडजवळ, ताजबाग, नागपूर
शेख शोएब शेख मेहफूज (वय २२), रा. चिखली चौक, कलमना, नागपूर
शेख तनवीर शेख इब्राहीम (वय २२), रा. आझाद कॉलनी, मोठा ताजबाग, नागपूर
तपासादरम्यान तिघा आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून, त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ३,६४,१३० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना वाठोड़ा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईचे श्रेय पोलीस आयुक्त श्री. रविंद्रकुमार सिंगल, सह आयुक्त श्री. निसार तांबोळी, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय पाटील, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) श्री. राहुल माकणीकर आणि सह आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाला जाते.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, उपनिरीक्षक अविनाश जायभाये तसेच स्टाफ सदस्य युवानंद कडु, अभिषेक शनिवारे, निलेश ढोणे, नाझीर शेख, अजय यादव, रोशन तिवारी, नितीन वर्मा, महेश आणि लक्ष्मण कलमकर यांनी अथक मेहनत घेतली.
शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची ही जलद व प्रभावी कारवाई नागरीकांसाठी दिलासादायक ठरली आहे.