सांगली – केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ३ दिवसांनी आकडेवारी जाहीर केली. सर्व मतदारसंघात अचानक ५-६ टक्के मतदानात वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून समोर आले.
नांदेडला मतदान संपताना ५२ टक्के मतदान होते, तिथे ६२ टक्के मतदान कसे झाले? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थितीत केला. ११ दिवस मतदान टक्केवारी जाहीर करायला कसे लागतात अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
डिजिटल इंडियात संध्याकाळपर्यंत किती मतदान झाले याचे आकडे आम्हाला समजत होते, पण आश्चर्य असे फक्त नागपूर मतदारसंघात अर्धा टक्के मतदान कमी दाखवलं आहे. नागपूर सोडून सगळीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, ११ दिवस का लागले. हा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान भाजपा मतदानात कमी पडला, त्यातून अचानक मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ११ दिवसांत वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते, तेव्हाही संध्याकाळी ७ पर्यंत आकडेवारी सांगितली जायची. यावेळी डिजिटल इंडिया त्यादिवशी संध्याकाळी आलेली आकडेवारी आणि त्यानंतर ११ दिवसांनी आलेली नवीन आकडेवारी यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असंही संजय राऊतांनी म्हटले.